कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील सुमारे ११ हजार कनेक्शनधारकांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने नोटीसा बजावल्या असून पाणी बिलाची रक्कम मुदतीत न भरल्यास पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार असल्याने नागरिकांनी पाणी बिलाची रक्कम तत्काळ भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

पाणी बिलाच्या वसुलीस महापालिका प्रशासनाने प्राधान्य दिले असून यासाठी पाच स्वतंत्र पथके तैनात केली असल्याचे सांगून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, यंदा पाणीबिल व सांडपाणी अधिभार असे मिळून ६८ कोटी ५० लाखाचे उदिदष्ट पाणीपुरवठा विभागास दिले आहे. तथापि आतापर्यंत केवळ १७ कोटीच्या आसपास पाणी बिलाची वसुली झाली आहे, उर्वरित वसुली मार्च २०२१ पर्यंत करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. पाणी बिलाच्या वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटीसा देऊन पाणी कनेक्शन बंद करण्याची तसेच चोरुन अथवा अनधिकृतपणे पाणी वापर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यावरही भर दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.