Hathras Stampede Tragedy : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये भोले बाबाच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 121 हून अधिक जणांचा हकनाक बळी गेला. या घटनेत महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. दरम्यान, सत्संग संपल्यानंतर भोले बाबा निघाले असता यावेळी त्यांच्या पायाखालची धूळ घेण्यासाठी भाविक पुढे सरसावले. याचवेळी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये अनेक भविकांचा मृत्यू झाला असून जखमींची संख्याही मोठी आहे.

दरम्यान, चेंगराचेंगरी कशामुळे झाली. याबबतच्या तपासादरम्यान धक्कादायक कारण समोर आलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्संगात मोठ्या संख्येने भाविक एकाच वेळी बाबाच्या चरणाची धूळ घेण्यासाठी पुढे आले होते. यानंतर एकच गोंधळ उडाला. बाबाला चरणस्पर्श करण्याच्या स्पर्धेतून चेंगराचेंगरी झाली. या अपघाताबद्दल झालेल्या तपासानुसार, एसडीएनने या सत्संग करणाऱ्या आयोजकांना परवानगी दिली होती. मात्र आयोजकांनी दिलेल्या नियमांचं पालन केलं नव्हतं. त्यामुळे आयोजकांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

हाथरसमधील मृतांचा आकडा एवढा मोठा आहे की, रुग्णालयातील शवाघरांमध्ये अजिबात जागा शिल्लक राहिलेली नाही. रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरांत मृतदेहांचा ढिग पडला आहे. घटनास्थळावरुन मृतदेह जखमी आणि मृतांना बस आणि टेम्पोमध्ये भरुन सिंकदराऊ सीएचसी आणि एटा जिल्ह्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं. एटा मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहांचा खच पाहून काळीज पिळवट होतं. अशातच घटनेवेळी कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

80 हजार भाविकांचा अपेक्षा, परंतू संख्या त्याहून जास्त…
या अपघाताच्या तपासानुसार, आयोजकांनी प्रशासनाला सांगितलं होतं की, या सत्संगात 80 हजारांच्या जवळपास लोक उपस्थित राहू शकतात. त्यामुळे प्रसासनाने त्यानुसार आयोजन करण्याची परवानगी दिली होती. मात्र तपासानुसार, त्यावेळी भाविकांची संख्या 80 हजारांहून खूप जास्त होती. काही वृत्तसंस्थांनुसार ही संख्या अडीच लाखांपर्यंत होती.

सत्संग संपल्यानंतर भोले बाबा निघाले होते. त्यावेळी पायाखालची धूळ घेण्यासाठी महिलांनी बाबाच्या दिशेने धाव घेतली. गर्दी हटवण्यासाठी तेथील प्रतिनिधींनी वॉटर कॅननचा उपयोग केला. त्यातून बचावासाठी जमावातील गोंधळ वाढला. गर्दी एकमेकांच्या अंगावर पाय ठेवून धावाधाव करू लागली.