कोल्हापूर  (प्रतिनिधी) : पूर्वी शासकीय दवाखान्यापेक्षा खाजगी दवाखान्यात विविध उपचारासाठी रुग्णांची गर्दी असायची. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती बदलली असून सध्या खऱ्या अर्थाने सरकारी दवाखाने गोरगरिबांसह धनदांडग्या रुग्णांना आधारवड ठरत आहेत.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अर्थात सीपीआरची ओळख थोरला दवाखाना म्हणून आहे. जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रुग्णांना सीपीआरच आधारवड ठरला आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली. धनदांडगे लोक तर किरकोळ उपचारासाठी खाजगी दवाखान्याचा लाभ घेत होते. खाजगी दवाखाना चांगला अशी समज अनेक लोकांची झाली होती.

तर खाजगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल व्हायचे. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याच्या उलट परिस्थिती निर्माण झा्ल्याचे दिसून येत आहे. सरकारीच दवाखाना बरा..अशी भावना जिल्ह्यातील नागरिकांत निर्माण झाली आहे. कोरोनामुळे खाजगीपेक्षा सरकारी दवाखान्याकडे रुग्णांची ओढ असल्याचे चित्र आहे. कारण कोरोनाच्या नावाखाली खाजगी दवाखान्याकडून सरेआम आर्थिक लूट सुरू आहे.

तर कोरोना रिपोर्ट असल्याशिवाय इतर आजारावर उपचार केले जात नाहीत. काही दिवसापूर्वी तर कोरोना रिपोर्ट नसल्याने दोन गरोदर महिलांच्या प्रसूती रस्त्यावर झाल्या होत्या. तसेच अनेकांना उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, सरकारी दवाखान्यात मात्र अल्प खर्चात कोरोनावर उपचार होत आहेत. त्यामुळे सध्या खऱ्या अर्थाने सरकारी दवाखानाचं गोरगरीब रुग्णांसह श्रीमंत लोकांचा आधारवड ठरत आहे.