दिंडनेर्ली (प्रतिनिधी) :  शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास जम्मू काश्मीर येथील राजौरी येथे पाकिस्तानने भ्याड हल्ल्या केला होता. यामध्ये करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील जवान संग्राम शिवाजी पाटील (वय 38)यांना वीरमरण आले. यांच्यावर उद्या (सोमवार) सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून याची तयारी पूर्ण झाली आहे.

निगवे खालसा येथील शहीद जवान संग्राम पाटील हे ज्या शाळेत शिकले  त्याच शाळेच्या पटांगणावर उद्या त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. चिनी शेटी विद्यालयाच्या भव्य पटांगणावर चिऱ्याचा चबुतरा उभारण्यात आला आहे. त्याच्या शेजारी व्हीआयपी आणि पाटील कुटुंबीयांसाठी मंडप उभारण्यात आला आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यवस्था मैदानावर करण्यात आली आहे. आज सकाळपासून गावातील तरुण मंडळे, युवक, ग्रामस्थ आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी अंत्यविधीसाठी लागणारी तयारी पूर्ण केली आहे.

तसेच गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापासून आणि गावातल्या मुख्य चौकापर्यंत शहीद जवान संग्राम पाटील यांचे वीर जवान अमर रहे असे फलक लावण्यात आले आहेत.