सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी गुरु दळवी ) मनसेचे नेते तथा पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा व प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्याकडे दिला असून आपला राजीनामा स्वीकारावा अशी त्यांनी मागणी केली आहे.

गेले काही दिवस सिंधुदुर्ग मनसेत खदखद आहे. दोन गट निर्माण झाले आहेत. यावरून त्या ठिकाणी काम करणाऱ्या उपरकर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या गटात नाराजी होती. ती आता उघडपणे बाहेर पडली आहे. त्यानुसार उपरकर यांनी आपण आपल्या सदस्य पदासह चिटणीस पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

आपण यापुढे फक्त माजी आमदार म्हणून कार्यरत राहू, असे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी बोलून दाखवली. तसेच जे माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ते आता नेमकी पुढची कोणती भूमिका घेतात, कोणत्या पक्षात जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.