कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शनिवारच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर विमानतळावर उपस्थित राहिलेल्या माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे पत्र त्यांनी तातडीने ठाकरे यांना पाठवले आहे.

अलीकडेच प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने हे शिवसेनेचे दोन खासदार एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. माजी आमदार राजेश क्षीरसागर हे देखील शिंदे समर्थक आहेत. शिवसेनेतील बंडाळीवेळी आ. प्रकाश आबिटकर हे सुध्दा सुरुवातीपासून शिंदे गटाबरोबर आहेत. कोल्हापूरच्या या दोन्ही खासदारांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने निष्ठावंत शिवसैनिकांनी दोघांच्या घरावर निषेध मोर्चा काढला होता. शिवाय प्रा. संजय मंडलिक यांना शिंदे गटात आणण्यासाठी नरके हे सक्रिय होते, असे खुद्द खा. मंडलिक यांनी एका वाहिनीवर मुलाखतीत सांगितले होते, याची आठवण सुनील मोदी यांनी पत्रात करून दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता माजी आमदार चंद्रदीप नरके हे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. असे असताना नरके यांना शिवसेनेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे चंद्रदीप नरके यांच्या या कृतीची दाखल घेऊन त्यांचावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.