हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने आज (सोमवार) तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणावेळी पाठिंबा देण्यास आलेल्या आ. राजूबाबा आवळे यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांनी त्यांना भाषण करण्यास मज्जाव करत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती तत्काळ उठविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. या मागणीसाठी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीच्यावतीने उपोषणाला सुरुवात केली. यावेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आ. राजूबाबा आवळे यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. यावेळी भाषण करण्यासाठी उभे राहताच त्यांना आंदोलकांनी मज्जाव केला. आरक्षणासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदारांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच सरकारच्या काळात आरक्षणाला स्थगिती मिळाल्याचे सांगत आंदोलकांनी त्यांना निरुत्तर केले.
या आंदोलनाला केवळ तोंडी पाठिंबा न देता मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी लावून धरली. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही शासकीय नोकरभरती करु नये ,यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. त्यावर आंदोलकांच्या संतप्त भावना सरकारला कळविण्याची ग्वाही देत आ. आवळे यांनी निरोप घेतला.
आंदोलनाचे प्रास्ताविक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील यांनी केले. यावेळी सचिव भाऊसाहेब फास्के, बी.एम.पाटील, दयासागर मोरे, उपाध्यक्ष दीपक कुन्नूरे, पंडित निंबाळकर, शिरोलीचे माजी सरपंच तात्यासाहेब पाटील, अॅड.संग्रामसिंह निंबाळकर, सुनील काटकर, अमित गर्जे, दत्तात्रय पाटील, पंढरीनाथ ठाणेकर, बी.टी.जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनाला हातकणंगले पंचायत समितीचे सभापती महेश पाटील, हातकणंगले नगराध्यक्ष अरुण जानवेकर, नगरसेवक मयूर कोळी, रिपाइंचे अनिल कांबळे यांनी पाठिंबा दिला.
यावेळी माजी उपसभापती दीपक वाडकर, नगरसेवक दीनानाथ मोरे, अभिजित लुगडे, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, सुहास पाटील, सचिनकुमार शिंदे, दत्तात्रय संभाजी पाटील, अजित खुडे, स्वप्निल करडे, प्रल्हाद तालुगडे, अमर वरुटे, राजेंद्र नर्मदे, संजय शिंदे, सुभाष पाटणकर, महादेव शिंदे, सुनील शिंदे, दीपक पोवार, तानाजी शिंदे, अविनाश शिंदे आदी उपस्थित होते.