टोप (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील मादळे येथील शेतकरी जालिंदर पवार यांनी २० गुंठे मुरमाड शेतीतून कलिंगडचे दहा टन उत्पादन घेतले आहे. यामध्ये त्यांना एक लाख रुपये दोन महिन्यात मिळाले आहेत. मिरची सारख्या आंतरपिकातून दुहेरी उत्पन्न  घेत त्यांना एक लाखाचे उत्पादन मिळाले.

जालिंदर पोवार यांनी खाजगी कंपनीत नोकरी सोडून स्वतःची शेती करण्याचा निर्णय घेतला. मादळे येथे पाण्याची तशी कमतरताच आहे. पण जिद्द आणि चिकाटी ठेवून आपला भाऊ सागर पोवार यांना सोबत घेऊन शेतीमध्ये सतत नवीन उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले. वडिलार्जित मुरमाड शेतीत पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत जानेवारी महिन्यात २० गुंठे  क्षेत्रात कलिंगड लागवड केली. शिवाय यातून आंतरपीक म्हणून ज्वाला मिरचीची लागवड केली आहे. पाण्याचे ठिबक द्वारा सुयोग्य नियोजन केले आहे. कलिंगड मधून त्यांना आत्तापर्यंत एक लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. तर आंतरपीक म्हणून घेतलेल्या मिरची उत्पादन सुरू आहे. यातून त्यांना सुमारे एक लाखाचे उत्पादन मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कमी कष्टात अधिक उत्पादन घ्यावे, असे त्यांनी सांगितले.