नाशिक (वृत्तसंस्था) : सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास खासगी बस आणि ट्रक यांची टक्कर झाली. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ५० जण होते. बसमधील प्रवाशांपैकी १० जणांचा मृत्यू झाला.

सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथेर गावच्या जवळ खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला. जखमींना सिन्नर आणि नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

शिर्डीला पोहोचण्यासाठी अर्धा तासांचा अंतर राहिलं असतानाच या अपघात झाला. या अपघातात दोन चिमुकल्यांसह सहा महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश होता.

अपघातामुळे एका नऊ वर्षांच्या चिमुकलीने आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. निधी उबाळे असे या चिमुकलीचे नाव आहे. निधी ही तिच्या आई-बाबा व काका – काकूंसह शिर्डी येथे आली होती. तिचे काका-काकू वेगळ्या बसमध्ये होते. ती तिच्या आई-वडिलांसह अपघातग्रस्त बसमध्ये होती. या अपघाताने तिचे आई-वडील हिरावून घेतले आहेत. निधी अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर येथून साई भक्त शिर्डी येथे दर्शनाला जात असताना अपघात झाला. उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या त्यातील एका बसला अपघात झाला. शिर्डीच्या दिशेने निघालेल्या खासगी आराम बस (एमएच ०४ एसके २७५१) आणि शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने जात असलेल्या मालवाहक ट्रक (एमएच ४८ टी १२९५) यांची समोरासमोर टक्कर झाली. अपघातातील मृतांचे कपडे व सामान यात रस्त्यावर विखुरलेले दिसत आहे. यात बसचा चुराडा झाला आहे. एका बाजूने बसचा सांगाडाच बाहेर पडल्याचे चित्र घटनास्थळावर दिसून आले.

नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

तसेच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अपघाताविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.