मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीच्या प्रोमोमधील भाषा ही केवळ दुर्देवी नसून महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री दात पाडणे, सुडाचं राजकारण, धमक्या देण्याची भाषा करतात हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेच्या विरोधातील आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख म्हणून बोलतायत, अशा शब्दांत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. 

बायका मुलं आम्हालाही आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरू, असे होत नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करावा, त्यांनी भाजपाला धमक्या देण्याच्या फंदात पडू नये, असा इशारा भातखळकर यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत दिला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ही विशेष मुलाखत घेतली असून शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. उद्या धमाका होणार असे म्हणत  मुलाखतीचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावरून भातखळकर यांनी पलटवार केला आहे.