मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहीरला शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे वरळी येथील ऍट्रिया मॉलसमोर मिहीर शहाने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती. यात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले होते. अपघातानंतर मिहीरने पलायन केले होते.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने मिहीर शाह याला अटक करत असताना त्याची आई आणि बहिण यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर मिहीरला पळून जाण्यासाठी 12 जणांनी मदत केल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी या 12 जणांना ताब्यात घेतले होते.अपघातावेळी मिहीरने मद्यपान केले होते का हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. अटकेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला शासकीय रुग्णालयात नेले जाईल त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांनी या प्रकरणी मिहीरचे वडील राजेश शाह आणि चालक राजऋषी बिडावत या दोघांना अटक केली होती. हिट अँड रन प्रकरणानंतर वडील राजेश यांनीच मिहीरला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. मिहीरला अटक झाल्यानंतर आता त्याच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे पहावे लागणार आहे. हा अपघात झाला तेव्हा नेमके काय घडले होते तसेच त्याला पळून जाण्यात कोणी मदत केली होती या गोष्टी चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे.