हातकणंगले ( प्रतिनिधी ) : हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने जागतिक मृदादिन साजरा करण्यात आला. हातकणंगले तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे यांच्या मार्गदर्शनखाली कृषी सहायक कुमारी पूजा येजरे यांच्या प्रमुख संयोजनाने गावातील प्रमुख, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

कृषी सहायक पूजा येजरे यांनी मृदा दिनानिमित्त उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हवा, पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्यामुळे रासायनिक खत आणि औषधामुळे दिवसेंदिवस जमीन नापीक बनत आहे. त्याचा परिणाम उत्पादन क्षमता प्रचंड घटली आहे.

अन्नधान्यातून माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा काळात आपण तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करावा, सध्या नैसर्गिक शेती करून येणाऱ्या संकटाना सामोरे कसे जायचे याची माहिती दिली. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करून उत्पादन क्षमता वाढवून अन्नधान्याची गुणवत्ता आणि सत्व वाढवणे गरजेचे आहे. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी शासनाचा कृषी विभाग आणि सेवाभावी संस्था त्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याचा लाभ आपण घ्यावा असे आवाहन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक आर. परीट, एस. अलमान हे अधिकारी उपस्थित होते.