कोल्हापूर ( प्रतिनिधीं ) : एकेकाळी भारतीय भूमीत जन्मलेला बुद्धिबळाचा खेळ जगात सर्व दूर पसरला आणि कालांतराने रशियाने या खेळामध्ये सर्व जगात आपली हुकुमत राखली. आधुनिक बुद्धिबळामध्ये बोरिस स्पास्की विश्वविजेता असेपर्यंत रशियाची मक्तेदारी प्रथम मोडून काढली ती अमेरिकेच्या सर्वकालीन श्रेष्ठ आणि अत्यंत बुद्धिमान असलेल्या बॉबी फिशर यांनी. ते वर्ष होते 1972, त्यानंतर 1975 मध्ये फिशरने खेळण्याचे नाकारले आणि अनातोली कार्पोव यास विश्वविजेतेपदाचा मान मिळाला. पुढे गॅरी कॅस्पाराव याने अनेक वर्ष अधिराज्य गाजवले. तोही रशियाचाच, मात्र विश्वनाथन आनंद यांनी पुढे क्रामनिकचा पराभव करून विश्वविजेत्याचा बहुमान मिळवला. असे मत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू व बुद्धिबळ अभ्यासक ( पुणे ) धनंजय इनामदार यांनी व्यक्त केलं
धनंजय इनामदार म्हणाले, विश्वनाथन आनंद यांनी पाच वेळा हा मान मिळवला. या आनंदच्या कामगिरीमुळे भारतात प्रचंड प्रमाणात बुद्धिबळाची लोकप्रियता वाढली. आनंदच्या या खेळातील आणि त्याच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वामुळे भारतीय बुद्धिबळामध्ये अनेक कुमार खेळाडू व त्यांचे पालक या खेळाकडे एक करिअर म्हणून आकर्षिले गेले. एक प्रकारे आनंदपर्वाच्या सुरुवातीने भारतीय बुद्धिबळाचा एक मजबूत पाया रचला गेला.2024 हे वर्ष भारतीय बुद्धिबळासाठी पुन्हा एकदा महत्त्वाचे ठरले. या वर्षात झालेल्या बुद्धिबळ ओलिंपियाड मध्ये भारताच्या स्त्री व पुरुष दोन्ही संघांनी भल्या भल्या संघांना मागे टाकत जागतिक सांघिक विजेतेपद मिळवले. या संघांमध्ये असलेल्या कुमार खेळाडूंमध्ये महत्त्वाचा एक खेळाडू होता तो डी गुकेश. त्यांनी अगोदरच जागतिक अजिंक्यपद यासाठी असणाऱ्या आव्हान वीर ठरवण्याच्या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व मिळवून अखेरीस हिकारू नाकामुरा या बलाढ्य खेळाडूस हरवून आव्हानवीर होण्याचा मोठा टप्पा पार पडला आणि आता सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विश्वविजेता असलेल्या चीनच्या डिंग लिरेन या एका चांगल्या ग्रँडमास्टरच्या अटीतटीच्या सामन्यात 14 व्या फेरीत साडेसात विरुद्ध साडे सहा अशा गुणांनी त्याचा पराभव केला.
यामध्ये त्याला फायदा झाला तो त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा आणि जिंकण्याच्या जिद्दीने खेळण्याच्या त्याच्या वृत्तीचा. डिंग लिरेन या स्पर्धेत काहीसा चाचपडत बचावात्मक धोरण ठेवून खेळताना दिसला त्याचा भक्कम बचाव भेदून शेवटी डी गुकेश याने मेहनतीने हे विश्वविजेते पद मिळवले. आनंदने बुद्धिबळामध्ये भारतीयांच्या विजयाचा पाया रचला तर डी गुकेश याने त्यावर कळस चढवला. पुढे ते म्हणाले आज गुकेश बरोबरच अर्जुन एरीगसी, प्रज्ञानंद, निहाल सरीन तर महिलांमध्ये वैशाली सारखे अनेक युवा बुद्धिबळ पटू हे सुपर ग्रँडमास्टर होऊन जागतिक पटलावर भारताचा दबदबा निर्माण करीत आहेत. आनंद कडून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेऊन हे खेळाडू पुढील किमान 25 वर्षे जगात आपले स्थान कायम ठेवतील असे वाटते.गुकेश हा त्याच्या खेळामुळे आणि त्याच्या नम्र वागणुकीमुळे आज सर्वांचा आदर्श झाला आहे हे नक्कीच. या गुकेशच्या विजयामुळे भारतीय बुद्धिबळातील सुवर्णयोगाचा उदय झाला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पुढे आता गुकेशची परंपरा चालू ठेवण्याची जबाबदारी ही भारतीय बुद्धिबळ संघटना, सरकारची बुद्धिबळ खेळाला मिळणारी मदत आणि खेळाडूंची महत्त्वाची मेहनत आणि पालकांचा त्यांना असणारा पाठिंबा या सर्वांवरच असणार आहे.
शालेय वयापासूनच प्राथमिक बुद्धिबळ शाळांमध्ये शिकवणे, त्यातून होतकरू व बुद्धिमान खेळाडूंची निवड करून त्यांना बुद्धिबळातील पुढील उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणे, हे काम देशाच्या संघटने बरोबरच सर्व राज्य बुद्धिबळ संघटना आणि जिल्हास्तरावरील तसेच स्थानिक बुद्धिबळ संघटना यांना करावे लागेल. मुलांच्या मेहनतीला प्रथम त्यांच्या पालकांचा पाठिंबा असणे आणि त्यांचे सक्रिय सहकार्य असणे हे महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण व स्पर्धांसाठी कुमार खेळाडूंना वेळोवेळी त्या ठिकाणी घेऊन जाणे, राहणे हे खर्चिक काम असते यासाठी अर्थसहाय्य करण्यास तसेच चांगल्या दर्शाचे प्रशिक्षक निर्माण करणे, प्रशिक्षण वर्ग व स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना संधी निर्माण करून देण्यास उद्योगपतींनी सरकारने प्रायोजकत्व स्वीकारून मदत करणे अपेक्षित आहे. असे झाल्यास हे सुवर्णयुग कायम राहून भारत बुद्धिबळामध्ये जागतिक महासत्ता ठरेल हे नक्कीच!