कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरात होणार आहे. दि.१५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन होणार असून, शिवसंवाद मेळाव्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंवाद दौरा आणि राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या अनुषंगाने कोल्हापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन व आढावा बैठक राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पार पडली.

राजेश क्षीरसागर म्हणाले की, देशभरातून शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कोल्हापुरात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा भगवा झंझावात कोल्हापुरात निर्माण करण्याची संधी कोल्हापूरच्या शिवसैनिकांना मिळाली आहे. या महाअधिवेशनावर शिवसेनेचे देशातील व राज्यातील भवितव्य अवलंबून असणार असून शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच, खाजगी सावकार आणि संपत चाललेल्या उबाठाच्या गटाच्या बांडगुळाकडून आपल्या राजकीय बदनामीसाठी षड्यंत्र रचले जात आहे. याला कॉंग्रेसच्या माजी पालकमंत्र्याकडून रसद पुरविली जात आहे. त्याला विरोधी पक्षनेतेही बळी पडले. दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची वाढणारी ताकद पाहून माजी पालकमंत्र्याच्या पायाखालची वाळू सरकली असून, राजकीय बदनामीसाठीच अशी स्टंटबाजी वारंवार केली जात असल्याची टीका राजेश क्षीरसागर यांनी केली.

जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, शिवसेनेचे महाअधिवेशन पार पाडायची जबाबदारी कोल्हापूरच्या शिवसैनिकांवर दिली आहे. ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कोल्हापुरातील शिवसेनेचे सर्व कार्यक्रम यशस्वी होतात. असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक अमोल माने आणि सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यासह इतर नूतन पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी महानगरसमन्वयक शिवाजी जाधव, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, निलेश हंकारे, अंकुश निपाणीकर, मंगल साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील आदी उपस्थित होते.