कोल्हापूर (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. या व्यवसायात महिलांना चांगली संधी असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्यसंस्था स्थापन कराव्यात असे आवाहन राहुरी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र बनसोड यांनी केले. लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र एन.सी.डी.सी. पुणे,सहकार मंत्रालय,भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज संस्थेचे ॲसेंब्ली हॉल,कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मच्छीमारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत अयोजित कार्यशाळेला पुणे मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त विजय शिखरे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सतिश बुलबुले सहकारी संस्था दुग्धचे सहाय्यक उपनिबंधक प्रदीप मालगावे प्रभारी मत्स्यविकास अधिकारी सतीश खाडे तसेच जिल्ह्यातील मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुणे राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे उपनिर्देशक पुनीत गुप्ता यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करुन आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.

प्राचार्य डॉ.रवींद्र बनसोड म्हणाले,मत्स्य शेतकऱ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेवून आपल्या संस्थेचे बळकटीकरण आणि विस्तार करण्याचा प्रयत्न करावा. तसेच पाण्याची गुणवत्ता आणि परिमाण वेळोवेळी तपासण्याबद्दल महत्व सांगताना जल संपत्ती आणि मत्स्यपालनाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. गुणवत्तापूर्ण बीज निर्मिती, बीज, संकलन, त्याची उपलब्धता हे मत्स्य व्यवसायातील यशाचा गाभा आहे. मच्छीमार बांधवांनी कोल्डस्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजार पेठेतील उपब्धता या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रशिक्षणा दरम्यान पुणे मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त शिखरे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाच्या विविध योजनांबाबत उपस्थित मच्छीमार संस्थांना मार्गदर्शन केले.मत्स्यविकास अधिकारी खाडे यांनी मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करावयाचे या संदर्भात मार्गदर्शन केले.प्रशिक्षणा दरम्यान मच्छीमार बांधवांसाठी झालेल्या सादरी करणांमध्ये ए.सी.खाडे,अधिकारी NCDC पुणे यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती दिली.महेश कडलग यांनी आभार व्यक्त केले. या एक दिवसीय कार्यशाळेला विविध मच्छीमार संस्थेच्या मच्छीमार प्रशिक्षाणार्थींचा उत्तम प्रतिसाद मिळाला.