कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गंत मास्क नसेल तर पेट्रोल, डिझेल, गॅस वितरणही करू नये, असा आदेश वितरकांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.
ते म्हणाले, जिल्हयातील पेट्रोल, डिझेल वितरण पंप, गॅस वितरण केंद्रातर्फे ग्राहकांना सेवा पुरविल्या जातात. या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिकांची येणे जाणे सुरू असते. येथेही मास्क वापरण्याची सक्ती करावी. यासाठी गॅस एजन्सी, पेट्रोल वितरकांनी मास्क नसेल तर सेवा देवू नये. यासंबंधी जागृतीसाठी मोठे डिजिटल फलक लावावे. पंपावर ठिकठिकाणी स्टिकर चिकटविणे व मास्क नसल्यास प्रवेश न देण्याचे बंधनकारक करावे. सामाजिक अंतर नसेल तर सेवा किंवा वस्तूचे वितरणही करू नये. पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या टू व्हीलर, फोर व्हीलर आणि इतर प्रकारच्या वाहनांवर ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ विषयक छोटे स्टिकर चिकटवण्यात यावेत.