कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – सहकार, राजकारण, कृषी क्षेत्रात चौफेर काम असणारे आ. पी. एन. पाटील हे काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक होते. ते आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाने अभ्यासू आणि धडाडीचा लोकनेता हरपला आहे.

आ. पाटील यांची पक्षनिष्ठा आणि गांधी घराण्यावरील निष्ठा आदर्शवत अशी होती. देशाचे पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्यावरील अपार श्रद्धेपोटी त्यांनी कोल्हापुरात राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला. काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उदघाटन करण्याचा निर्धार त्यांनी पूर्णत्वास नेला. स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त गेली तीस वर्षे सलगपणे सद्भावना दौड आयोजित करून राजीवजींच्या स्मृती अखंडपणे जपल्या. दिंडनेर्ली येथील सूतगिरणीला राजीव गांधी यांचे नाव दिले.

१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतरच्या अडचणीच्या काळात त्यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. मोठ्या कौशल्याने पक्ष संघटना मजबूत केली. काँग्रेस कार्यकर्त्यांना नेहमीच भक्कम पाठबळ दिले. तब्बल २२ वर्षे त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि कार्यक्षमतेने जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.

माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. देशमुख साहेबांचे निष्ठावंत सहकारी म्हणून संपूर्ण राज्यभर त्यांची ओळख होती. देशमुख साहेब कोल्हापुरात आल्यावर पी. एन. कुठे आहेत? अशी विचारणा करायचे. या दोघांचा परस्परांवर खूप विश्र्वास तर होताच. पण त्याबरोबरच मैत्रीचे घट्ट स्नेहबंध होते.

राजीवजी सूत गिरणी, श्रीपतराव दादा बँक, निवृत्ती संघ या व अशा अनेक संस्था उभा करून त्या अत्यंत चांगल्या प्रकारे चालविण्याची किमया पी. एन. साहेबांनी करून दाखवली. जिल्हा बँकेचे ३५ वर्षे संचालक म्हणून काम करताना त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा आग्रह धरला. बँकेचे अध्यक्ष म्हणून १९९१ ते १९९५ या काळात काम करताना शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा व्याजदर ११ टक्के वरून ७ टक्के करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरसकट २० हजार रुपयाचे अनुदान मिळवून देण्यासाठी आग्रही प्रयत्न केले. भोगावती साखर कारखान्याला त्यांनी उर्जितावस्था प्राप्त करून दिली. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सव – 2024 मध्ये सहकारातील आदर्श नेतृत्व या पुरस्काराने कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

आ. पी. एन. पाटील यांचा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता. जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या वेळी कधीही धावून येणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांनी समाजकारणासोबतच कृषी, सहकार व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.