मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाचे नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानामुळे पक्षातील नेत्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. तर गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटातील काही नेत्यांनी कारवाईची मागणी केली आहे. तर यावर बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर करवाईबाबत दोन-तीन दिवसात निर्णय होईल, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे.

गजानन कीर्तिकर यांनी केल्या विधानामुळे मित्रपक्ष भाजपचे नेते नाराज झाले आहेत. दुसरीकडे पक्षाचा उमेदवाराविरोधात रिंगणात असलेल्या ठाकरेंच्या उमेदवाराबद्दल कीर्तिकरांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे विधान केले होते. या सगळ्या प्रकरणावर संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे.

“कीर्तिकरांनी ती भूमिका घेतली, याबद्दल सर्वांना संशय आहे. बोलून जरी दाखवत नसले, तरी कीर्तिकरांनी अशी भूमिका घेऊ नये, या मताचे आम्ही सर्वजण होतो आणि आजही आहोत. आपल्या मुलाच्या उमदेवारीबद्दल त्यांनी भाष्य करायलाच नको होते”, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली आहे.

कीर्तिकरांच्या घरात भांडणं लावण्याचा ठाकरे गटाचा डाव
“उबाठा गटाने केलेला तो गेम, तो त्यांच्या अंगलट आलेला आहे. त्यांच्याच घरातून उमेदवारी देऊन घरामध्ये भांडणं कशी लागतील किंवा त्यांना मजबुरीने यांचं काम कसं करावं लागेल, असा तो डाव होता”, आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.
“कीर्तिकरांसारख्या मोठ्या नेत्याने शांत बसणे हा त्याच्यावरचा पर्याय होता. चर्चेला वाव दिलेला आहे आणि म्हणून चर्चेची ही लाईन कुठे जाईल सांगता येत नाही. तरी आमच्याकडे जी समिती आहे, त्या समितीकडे हे प्रकरण गेलेलं आहे. त्याच्यावर दोन-तीन दिवसांत निर्णय सुद्धा होईल”, अशी माहिती शिरसाट यांनी दिली आहे.