कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. आगामी काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच महपालिकेची निवडणूक सुद्धा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरची की पुण्याची निवड करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातही शिवसेनेतील बंडखोरीचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देत गुवाहाटीमध्ये गेले होते. यामुळे मंत्रिपदासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर आणि प्रकाश आबिटकर रेसमध्ये असतील. त्याचबरोबर भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनाही संधी मिळते का? याचीही उत्सुकता आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार? याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकमंत्रीपद सतेज पाटील यांच्याकडे होते. गेल्या अडीच वर्षापासून त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. आता मविआ सरकार कोसळल्याने ही जबाबदारी कोणाकडे जाणार याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील हेच प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी सध्या सद्यस्थितीमध्ये ते पुण्यामधील कोथरूड मतदारसंघाचे आमदार आहेत. मतदारसंघावर लक्ष ठेवण्यासाठी ते पुण्याचे पालकमंत्री स्वीकारतात की कोल्हापूरला प्राधान्य देतात? याची उत्सुकता आहे. जिल्ह्यामध्ये भाजपचे अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. धनंजय महाडिक खासदार झाल्याने महाडिक गट आणि भाजपमध्ये उत्साह आणखीनच वाढला आहे.