असित बनगे (लाईव्ह मराठी): संपूर्ण देशासह राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी दारूण पराभव केला. त्यांच्या या पराभवानंतर बारामती ही शरद पवारांचीच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. दरम्यान कालच्या निकालानंतर सर्वत्र चर्चा सुरु आहे ती अजित पवार यांनी प्रचारादरम्यान केलेल्या ‘त्या’ वक्तव्याची.

लोकसभा निवडणुकीत महायुतीसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला. अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंसोबत असलेल्या पवार कुटुंबीयांवर निवडणूक प्रचारादरम्यान आव्हान देणारे वक्तव्य केले होते. सुळेंच्या प्रचारात असलेला एकही पवार 4 जून नंतर दिसणार नाही, जर दिसला तर मी माझ्या मिशा काढेन, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. यावर अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होत. 4 जून नंतर अजित पवार खरंच मिश्या काढतील असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं होत. त्यामुळे काल लागलेल्या निकालानंतर अजित पवार मिश्या काढणार का? अशा चर्चा सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्याच्या राजकारणात शब्दाला जागणारा नेता अशी ओळख आहे. अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुळेंच्या प्रचारात असलेला एकही पवार 4 जून नंतर दिसणार नाही, जर दिसला तर मी माझ्या मिशा काढेन, असं जाहीर वक्तव्य केलं होतं. मात्र काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. त्यामुळे आता शब्दाला जागणारे अजित पवार मिश्या काढणार का ? असे विरोधकांमध्ये सूर उमटत आहेत.