मुंबई – पुण्यातील हिट अँड रन केस सध्या चांगलंच चर्चेत आहे. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी एक घटना घडली होती. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापले. यामध्ये नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. काल सोशल मीडियावर राहुल गांधींनी मोदींवर निशाणा टाकत पोस्ट केली की न्याय फक्त श्रीमंतांना मिळतो गरिबांना नाही. अशातच आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले नितेश राणे..?

नितेश राणे म्हणाले, नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का आहेत? शरद पवार गटाकडून कोणती प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सु्प्रिया सुळे गप्प का आहेत? अग्ररवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का? आरोपीचे वकील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. देवेंद्र फडणीसांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या मुलावर कडक कारवाई सुरू आहे. आता सुप्रियाताईंनी त्या गप्प का आहेत ते आम्हाला सांगावे. त्यानंतर खूप रहस्य बाहेर येतील. असे ते म्हणाले. एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा सवाल केला आहे. अशातच आता यावर सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.