नवरात्री हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सन आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. त्यानुसार, उद्या म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर अनेकांना वेध लागते ते नवरात्रीचे. या काळात नवदुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते. अर्थात या वेळी कलश स्थापना करण्याची परंपरा आहे. कलश स्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या 9 दिवसांची पूजा अपूर्ण मानली जाते. हा कलश पहिल्या दिवसांपासून ते नवव्या दिवसापर्यंत घरात ठेवला जातो. त्यानंतर हा कलश दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी विसर्जन केला जातो. परंतु, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना, नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते? जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

नवरात्रीत कलश स्थापना का केली जाते?

हिंदू धर्मात कलश हे मातृशक्ती, त्रिमूर्ती आणि त्रिगूण शक्तीचे प्रतीक मानले जाते. ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी-देवताचा वास असतो. नवरात्रीच्या काळात कलशाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे.

या कलशाची स्थापना करताना सर्व देवी-देवातांना आवाहन करुन पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. त्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मान्यात आले आहे. कलशाच्या मुखात विष्णू, गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्म देवाचा वास असतो असे म्हटले जाते. तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध, शीतल आणि स्वच्छतेचे प्रतीक मान्यात आले आहे.

शारदीय नवरात्री 2024 कधी आहे?

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होते. यंदा ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी सुरु झाली असून 4 ऑक्टोबरला पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार, शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरु होईल.

घटस्थापना मुहूर्त

नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी सुरू होईल आणि तो 7 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. घटस्थापनेसाठी अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत असेल.