कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस होय.दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसने होते.आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी ही रमा एकादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखली जाते.महाराष्ट्रामध्ये या दिवासापासून दिवाळी या सणाला सुरुवात होते.या दिवशी गाईसह तिच्या वासराची पूजा केली जाते.
तर का केली जाते गाईसह तिच्या वासराची पूजा जाणुन घेवूया,भगवान श्रीकृष्णाला गाय अत्यंत प्रिय आहे आणि गोवत्स द्वादशी हा सण गाईला समर्पित आहे.हिंदू पंचांगानुसार,गोवत्स द्वादशी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो,ज्याला बच बारस आणि वसू बारस असे देखील म्हणतात.गोवत्स द्वादशी हा सण वर्षातून दोनदा साजरा केला जातो. पहिला भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला आणि दुसरा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण साजरा केला जातो.
यंदा कार्तिक महिन्याची गोवत्स द्वादशी आज सोमवार 28 ऑक्टोबरला साजरा करण्यात येत आहे.पौराणिक कथेनुसार,सर्व देवी-देवता,पूर्वज आणि तीर्थक्षेत्रे गाईमध्ये वास करतात,म्हणून गोमातेची सेवा आणि पूजा केल्याने सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात.एतकेच नाही तर गोमातेचे दर्शन घेतल्याने मोठे यज्ञ,दान आणि तीर्थयात्रा केल्याप्रमाणे फळ मिळते असे म्हणतात.