मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला असून महायुती सरकारने तब्बल 234 जागा जिंकल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी आत्ता महायुती बैठका घेत आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीदरम्यान, सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यानंतरच्या सत्ता स्थापनेबाबत केल्या जाणाऱ्या चर्चा मुंबईत होणार असतानाच एकनाथ शिंदे हे गावी निघून गेले. त्यामुळे आज होणाऱ्या बैठका रद्द झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे ‘या’ गावी गेले आहेत..?

एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी गेले आहेत. आज दुपारीच ते ठाण्याहून साताऱ्यासाठी निघाले. आज त्यांचा मुक्काम गावीच होणार असून अचानक एकनाथ शिंदे गावी गेल्याने सत्ता स्थापनेसाठी आणखी विलंब होणार आहे. शिंदे अचानक गावी गेल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

विधानसभा निवडणूकीचा निकाल गेल्या शनिवारी लागला. त्यानंतर सत्ता स्थापन करण्याच्या चर्चाना आणि बैठकांना उधाण आले होते. यानंतर मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत होतीत. मात्र, दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला नव्हता. काल अखेर मौन सोडत एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.