मुंबई (प्रतिनिधी) : दादरचे 80 वर्षे जुने हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस बजावल्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान आता दादरच्या हनुमान मंदिरात सायंकाळी महाआरती होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आ. आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, स्थानिक आ. महेश सावंत, आ. संजय राऊत आणि हजारो शिवसैनिक त्या आरतीला जाणार आहेत. हिंदू म्हणून भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल तर त्यांनी आरतीला यावं. आम्ही त्यांच्या हातात गदा आणि घंटा देऊ, असा टोला देत संजय राऊतांनी भाजपवर खरमरीत टिका केली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.

हनुमान मंदिर पाडण्यासाठी दिलेल्या नोटीसवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत’, तर हिंदू मत मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचंही ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर आ. संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले..?

राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या डोक्यात सडके कांदे आहेत, सडके बटाटे आहेत. ते काही हिंदुत्वाचे बाप बनलेत का..? हिंदुत्वाचा सातबारा त्यांच्या नावावर कोणी केला..? भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेले. त्या वाटेवर पण त्यांनी आता खड्डे करून ठेवले आहे. हे आम्हाला काय हिंदुत्व शिकवत आहेत असं म्हणत भाजपवर राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

राऊत पुढे म्हणाले की, मुळात आमचं हिंदुत्व हे मतांसाठी नाही. हिंदुत्व हे आमचे जीवन आहे. हिंदुत्व ही आमची संस्कृती आहे. तुमच्यासारखे आम्हाला हिंदुत्वासाठी कुदळ फावडे घेऊन फिरावे लागत नाही. हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या आणि मग हिंदुत्वावर बोला, असे आव्हानही संजय राऊतांनी भाजपला दिले आहे.