मुंबई : पुण्यातील कल्याणीनगर येथे रविवारी रात्री पोर्श कारच्या अपघातत दोन जणंना आपला जीव गमवावा लागला. यानंतर मुख्य आरोपी वेदान्त अग्रवालला बालहक्का न्यायालयाने 15 तासांतच जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयाने सोशल मीडियातून संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. यानंतर वेदांत अग्रवाल याचा जामीन फेटाळत बाल हक्क न्यायालयाने 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. मात्र ज्या दिवशी अपघात घडला, त्यावेळी पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे अपघातात आरोपीच्या मदतीसाठी गेलेला आमदार कोणत्या पवारांचा आहे, असा थेट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

पुणे अपघातावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, पुणे अपघातात आरोपीच्या मदतीसाठी गेलेला आमदार कोणत्या पवारांचा आहे. पुण्यातील उद्योगपती अग्रवाल याच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न पवार यांचा आमदार करत आहे. हा आमदार कोणत्या पवारांचा आहे? हे मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांना एक पत्र देण्यात येणार असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सांगलीचे काँग्रेस बंडखोर आमदार विशाल पाटील यांच्यावर निलंबनाच्या कारवाई संदर्भात दिल्लीच्या वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई होईल, असा विश्वास एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?
दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर येथे रविवारी रात्री पोर्श कारच्या अपघातत दोन जणंना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन फेटाळत बाल हक्क न्यायालयाने 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. मात्र ज्या दिवशी अपघात घडला, त्यावेळी पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. आमदार आणि नेतेमंडळी बड्या बापासाठी धावाधाव करतात, सर्वसामान्यांना कुणी वालीच नाही, असा संतप्त सवाल सोशल मीडियातून विचारला गेला. यानंतर सुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे असल्याचे समोर आले, असे असतानाही नाना पटोले यांनी उद्योगपती अग्रवाल याच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करणारा आमदार हा कोणत्या पवारांचा आहे? असा प्रश्न विचारला आहे.