मुंबई : आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन दरवर्षी 28 ऑक्टोबरला जगभरात साजरा केला जातो.ॲनिमेशन हा प्रकार सुरुवातीला व्यावसायिक रंगभूमीवर सुरू करण्यात आला होता.पण आता तो थ्रीडी आणि स्पेशल इफेक्ट्ससह मोठ्या पडद्यावर पोहोचलेला आहे.आजही काही लोक ॲनिमेशनला फक्त कार्टूनच समजतात,पण व्यंगचित्र ही ॲनिमेशनची फक्त एक छोटी शाखा असून आज आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन साजरा करण्यामागचा उद्देश ॲनिमेशनच्या माध्यमातून मनोरंजन आणि कला क्षेत्रात होणाऱ्या बदलांविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हाच आहे.

या क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असतात आणि यामुळे मनोरंजन क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत आहेत.आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिनाची सुरुवात 2002 साली आंतरराष्ट्रीय ॲनिमेटेड फिल्म असोसिएशनने केली होती.28 ऑक्टोबर हा दिवस निवडण्यामागचं कारण की,याच दिवशी,1892 साली चार्ल्स-एमिल रेनॉड यांनी पॅरिसमधील ग्रेविन म्युझियममध्ये पहिल्या ॲनिमेटेड चित्रपटाचे प्रक्षेपण केले होते.त्यावेळी “पँटोमाइम्स ल्युमिनस” हा त्यांचा कार्यक्रम होता,ज्यात ‘पौव्रे पिएरोट’,‘अन बॉक’,आणि ‘ले क्लाउन एट सेस चियन्स’या तीन चित्रपटांचा समावेश केला होता.

यानंतर 1895 मध्ये ल्युमिएर बंधूंच्या सिनेमॅटोग्राफने या तंत्रज्ञानाला मागे टाकले,पण रेनॉड यांच्या या प्रयोगाने मनोरंजन क्षेत्रात ऐतिहासिक योगदान दिले होते.ॲनिमेशन क्षेत्रात करिअर करण्यासाठी खुप संधी आहे.तर आजकाल ॲनिमेशनची मागणी चित्रपट,जाहिराती,गेम्स आणि वेब सिरीजमध्ये वाढत चाललेली दिसून येते आहे.नोकरीच्या संधींचा विचार करता,ॲनिमेशन क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी कंपन्या फ्रीलान्स किंवा पूर्णवेळ ॲनिमेटरची नियुक्ती करत आहे.