मुंबई ( प्रतिनिधी ) : विक्रांत मेस्सीने फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनात आपली चांगली छाप सोडली आहे. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या एका सोशल मीडियाच्या पोस्टवरून खूप चर्चेत होता. आता विक्रांतने त्याविषयी खुलासा केला आहे. तो म्हणाला की, “मी त्या पोस्टमध्ये बरंच इंग्रजी लिहिलेलं आणि अनेकांचा गैरसमज झाला. म्हणूनच मी क्लिअरिफिकेशन जारी केलं आहे. मी रिटायर होत नाही. मी स्वतःला आणखी उत्तम बनवण्यासाठी खूप आवश्यक ब्रेक घेत आहे.”

विक्रांत पुढे म्हणाला, त्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, गेली काही वर्षे खरोखरच छान गेली आहेत. मी गेल्या वर्षांसाठी सर्वांचा आभारी आहे. मी जे मागितलं होतं, त्यापेक्षा खूप जास्त मिळालं. एक अभिनेता म्हणून मी गेली 21 वर्ष प्रोफेशनली काम करत आहे, पण ’12th फेल’ नंतर खूप छान वाटलं. फक्त संदर्भात गोष्टी मांडण्यासाठी, मी ती पोस्ट मध्यरात्री केली, कारण मला झोप येत नव्हती. सध्या मला माझ्या मुलाला मोठं होताना पाहायचंय, अजून लिहायचंय आणि माझ्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. मी बऱ्याच वर्षांपासून 4-5 तासांपेक्षा जास्त झोपलो नाही आणि मला हे सुधारण्याची गरज आहे.

विक्रांत मेस्सी ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये दिसून आला होता. आता तो ‘यार जिगरी’, ‘TME’और ‘आंखों की गुस्ताखियां’ मध्ये शनाया कपूरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाची शुटिंग सध्या सुरू आहे.