मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. प्रचारादरम्यान सत्ताधारी नेते आणि विरोधक नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यासंबंधीच्या आरोपांवर भाष्य केलं. दिवंगत आर. आर. पाटील यांनी केसाने माझा गळा कापला. सिंचन घोटाळ्यासंबंधी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचे आरोप झाले. आरोप झाल्यावर कारवाई करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे फाईल गेली. त्यावेळी आर. आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करण्याचे आदेश देत फाईल सही केली. असा आरोप त्यांनी लगावला आहे आता या आरोपांवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
काय म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केलेली सिंचन घोटाळ्याची फाईल माझ्यापर्यंत कधी पोहोचलीच नाही. मी कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी केली नाही आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत अजित पवारांच्या चौकशीचे आदेशही दिले नाहीत. सिंचन घोटाळा हा काही अजित पवारांची पाठ सोडत नाही. पण यासंदर्भात स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे.मी जेव्हा सिंचन घोटाळ्याबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली होती. पण मी माझ्या काळात 70 हजार कोटींचा घोटाळा असा शब्द वापरला नाही. श्वेत म्हणजे चौकशी नाही, अजित पवारांच्या 2010 -11च्या आर्थिक पाहणी अहवालात गेल्या 10 वर्षांत 70 हजार कोटी रुपये खर्च झाले. सिंचनाची टक्केवारी 18.0 वरून 18.1 अशी झाली, हे अजित पवारांच्या नियोजन मंडळाच्या अहवालात नमुद करण्यात आले.
पुढे ते म्हणाले, मी नव्याने मुख्यमंत्री झाल्यावर मी जेव्हा ते पाहिलं त्यावेळी मला जरा धक्काच बसला. मी सिंचन खात्याकडे याची शहानिशा कऱण्याचे आदेश दिले. सिंचनाच्या टक्केवारी फार वाढ झालेली नाही. मग वस्तुस्थिती नेमकी काय आहे. याचा अहवाल सादर कऱण्यास सांगितले. चौकशी करायची होती तर ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच दिली असती. पुढे मग त्याची चौकशी झाली, विधीमंडळात चर्चा झाली. त्यानंतर विदर्भ सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी व्हावी, असा अहवाल खालून आला होता. तो अहवाल तत्कालीन गृहमंत्री आर. आर पाटील यांना सादर कऱण्यात आला. त्यावर अॅंटी करप्शनची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर मला असं कळालं की गृहमंत्र्यांनी त्यांच्या स्तरावरी चौकशीचे आदेश दिले होते. पण त्यासंदर्भातील कोणतीही फाईल आलीच नाही. त्या संबधी चौकशी लावण्याचे आदेशही दिले नाही. पण नाहक माझा बळी घेतला, माझं सरकार पाडलं, आणि भाजपच्या राजवटीची मुहूर्तमेढ रोवली. ती फाईल मी पाहिलीही नाही, गृहंत्र्यांच्या मान्यतेनंतर ती फाईल खाली गेली. अजित पवार बोलले ते खरं असेलही पण त्यात माझा काय दोष? सिंचन घोटाळा असेल, किंवा राज्य सहकारी बँकेचे प्रकरण असेल, त्याची मला शिक्षा भोगावी लागली. पण हा घोटाळा 70 हजार कोटींचा होता की 40 हजार कोटींचा होता, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच माहित, ते भोपाळमध्ये बोलले, ते पाहिलं तर दुसरं कुणी शिक्कामोर्तब करायची गरजच नाही. आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.