मुंबई – सध्या राज्यात विधानसभेचं रणांगण सुरु आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचाराला लागले आहे . निवडणूका तारीख जाहीर झाल्यांनतर राजकीय नेते ऍक्शन मोडवर पाहायला मिळत आहेत. अशातच आता महाविकास आघाडी जागा वाटपासंदर्भातील मतभेत आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे म्हटले होते. यानंतर काँग्रेस आणि शिवसेनामध्ये वाद विकोपाला गेल्या असल्याचे बोललं जात होत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. बाळासाहेब थोरात हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात..?
संजय राऊत आणि नाना पटोले यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे मविआत बिघाडी होणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला सतावत होता. त्यामुळे आता मविआच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी राऊत-पटोले यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात आणि अनिल देसाई यांना पुढे करण्यात आले आहे का, असा प्रश्न थोरात यांना विचारण्यात आला. यावर बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, आमच्यापैकी कोणीतरी एक नेता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना भेटणार होता. मात्र, रमेश चेन्नीथला यांनी मला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जायला सांगितले. शरद पवार आणि माझी चर्चा चांगली झाली. आता काही थोड्या जागांवर निर्णय बाकी आहे. यामधून लवकरच मार्ग निघेल, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
मविआत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मात्र, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक पक्षाला आग्रह धरण्याचा अधिकार आहे. कारण मविआतील तिन्ही पक्षांकडे चांगले उमेदवार आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी प्रत्येक पक्षाकडून आग्रह धरला जात आहे. यामध्ये कोणताही वाद नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.