राधानगरी : काळम्मावाडी जलाशय पाहण्यासाठी आलेला कोरोची येथील उज्वल गिरी हा तरुण जलाशयासमोरील नदी पत्रातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (दि.23) रोजी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, इचलकरंजी कोरोची तालुका हातकणंगले येथील उज्वल कमलेश गिरी (वय 21) मूळ बिहार हा तरुण मित्रांसमवेत राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी जलाशय पाहण्यासाठी आला होता. काळम्मावाडी वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारे पाणी कालव्याद्वारे नदीत सोडले जाते, काही अंतर पुढे गेल्यानंतर कोसळणाऱ्या पाण्याचे छोट्याशा नयनरम्य धबधब्यात रूपांतर होते. कोसळणारे पाणी पाहण्यासाठी उज्वल व त्याचे मित्र आले होते. सेल्फी काढण्याच्या नादात उज्वल पाय घसरून नदी पात्रात पडला आणि वाहत्या पाण्यातून वाहत गेला. त्याठिकाणी राधानगरी पोलीस अधिकारी रेस्क्यु टीमसह दाखल झाले. रेस्क्यु टीमने बोटीसह व्यक्तीचा शोध घेतला असून आज दुपारी त्याचा मृतदेह सापडला आहे.