कळे ( प्रतिनिधी ) : सावर्डे तर्फ असंडोली ( ता.पन्हाळा )  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या प्रांगणात आठवडी मिनी बाजार भरविला होता. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामान्य ज्ञान वाढविणे, दैनंदिन व्यवहार, बाजार खरेदी-विक्रीचा आणि नफा-तोटाचा अनुभव, संवाद कौशल्य, बौद्धीक क्षमता वाढविणे या उद्देशाने आठवडा मिनी बाजाराचे आयोजन केले होते. 

मुलांनी आपल्या शेतातील विविध प्रकारच्या ताज्या पालेभाज्या, फळेभाज्या आणल्या होत्या. सेंद्रीय गुळ, कडधान्ये, विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल विक्रीसाठी मांडले होते. ताजी ताजी भाजी, वडापाव स्वस्तात मस्त अशी आरोळी देत ग्राहकांना विद्यार्थी आकर्षित करत होते. खरेदीसाठी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ग्रामस्थांनी बाजार खरेदी बरोबर खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला. 

या उपक्रमात 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुमारे 20 हजार रुपयांची उलाढाल झाली. जि. प. प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक राजू अत्तार, दत्तात्रय पाटील, सविता मायाण्णा, रामेश्वर राठोड यांनी नियोजन केले. 

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णात पाटील, उपाध्यक्ष मारूती पाटील, सदस्य आनंदा पाटील, विद्या गुरव, सरपंच संभाजी कापडे, उपसरपंच नंदा पाटील, ग्रा. पं. सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.