हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्याच्या आरोग्य विभागाचा 100 डेज क्षयरोग मोहीम 2024 या कार्यक्रमाचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र पुलाची शिरोली येथे गावाच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण विधानसभा कोल्हापूर विधानसभेचे आमदार आणि शिरोली गावचे सुपुत्र अमल महाडिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अवचित्य साधून टीबी रोगाचे अचूक निदान करणाऱ्या TRUENAT या आधुनिक मशीनचे उद्घाटन उपस्थितांच्या हस्ते झाले.

हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हातकणंगले नंतर हे दुसरे मशीन प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली येथे ठेवण्यात आलेले आहे. त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन हातकणंगले तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. दातार यांनी केले. आमदार महाडिक यांनी यावेळी बोलताना लवकरच शिरोली येथे मोठे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून कार्यरत करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला.

प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियनांतर्गत हातकणंगले तालुक्यात गावोगावी जनजागरण रॅली तसेच आशा कर्मचारी, आरोग्य सेवक, सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांच्या वतीने या संदर्भात घरोघरी जाऊन प्रबोधन करण्यात येत आहे. त्यातून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि इतर वेगवेगळे साथीचे आजार यावर मोफत आणि तत्काळ उपचार करण्यात येत आहेत. डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रक्ताचे नमुने घेऊन मोफत तपासणी करण्यात येते. आणि 12 तासाच्या आत आपल्या मोबाईलवर टेस्ट रिपोर्टचा आहावल संबंधित रुग्णांना पाठवला जातो.

यावेळी उपस्थित रुग्णांनी तत्काळ आणि चांगल्या प्रकारच्या सरकारी सेवेबद्दल आरोग्य विभागातील डॉक्टर, कर्मचारी यांच्याबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले. टीबी हा हमकास बरा होणारा आजार असून मनातील समज गैरसमज दूर करून उपचार घ्यावेत असे आवाहन उपस्थित प्रमुख डॉक्टरांनी व्यक्त केले. गतवर्षी आमदार अमल महाडिक यांनी 500 क्षय रुग्णांना मोफत पोषण आहार किट वाटप केल्याचे सांगितले. विविध सेवाभावी सामाजिक संस्था, उद्योगपती, कारखानदार यांनी पुढे येऊन अश्या कार्यक्रमाला आणि रुग्णांना सडळ हातानी मदत करावी असे आवाहन केले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने, खासगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर, ग्रामस्थ, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.