नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2024 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचं मतदान शनिवारी दिनांक 25 मे रोजी होणार आहे. यामध्ये 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांवर मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार होत्या, मात्र त्या पुढे ढकलण्यात आल्या. आता सहाव्या टप्प्यात येथे मतदान होत आहे.
या टप्प्यात 3 केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृष्ण पाल सिंग गुर्जर आणि राव इंद्रजित सिंग हे रिंगणात आहेत. तीन माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, मनोहर लाल खट्टर आणि जगदंबिका पाल हे देखील निवडणूक लढवत आहेत.याशिवाय मनोज तिवारी, मनेका गांधी, नवीन जिंदाल, बन्सुरी स्वराज, संबित पात्रा, राज बब्बर, निरहुआ हेही आपले नशीब आजमावत आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या टप्प्यात 889 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये 797 पुरुष आणि 92 महिला उमेदवार आहेत. या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नवीन जिंदाल आहेत. त्यांच्याकडे 1241 कोटी रुपयांची संपत्ती आहे. लोकसभेच्या 543 जागांपैकी पाचव्या टप्प्यापर्यंत 429 जागांवर मतदान झाले आहे. 25 मे पर्यंत एकूण 487 जागांवर मतदान पूर्ण होईल. शेवटच्या आणि सातव्या टप्प्यात 56 जागांवर मतदान होणार आहे.
183 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे, 141 जणांवर खून, अपहरण असे गंभीर गुन्हे
एडीआरच्या अहवालानुसार, 183 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तसेच 141 उमेदवारांवर खून, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 12 उमेदवार कोणत्या ना कोणत्या प्रकरणात दोषी ठरले आहेत. 6 उमेदवारांवर खुनाचे आणि 21 खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. 24 उमेदवारांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. 3 उमेदवारांवर बलात्काराचा गुन्हा (IPC-376) दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी 16 उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.