मुंबई : येत्या शुक्रवारी म्हणजेच 12 जुलैला विधानपरिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी मतदान होत आहे.सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, असं चित्र होतं, मात्र राजकीय पक्षांनी 12 उमेदवार रिंगणात ठेवल्याने ही निवडणूक अटळ झाली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांच्यासह पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात निवडणुकीला उभे असलेले उमेदवार आमदारांना आपल्यालाच मत द्याव अशी विनंती करत आहेत. भाजपच्या तिकिटावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे विधान परिषद निवडणुक लढवत आहेत. सदाभाऊ खोत हे अधिवेशनात येणाऱ्या जाणाऱ्या विधानसभा आमदारांना आपल्याला मत देण्याची विनंती करताना पाहायला मिळत आहेत. सर्वांना नमस्कार करत “मलाच मत द्या आणि निवडून आणा” अशी विनंती करताना ते विधान भवन परिसरात दिसून आले आहेत.

या निवडणुकीत मतदान गुप्त मतदान पद्धतीने होणार असल्याने घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होणार हे नक्की आहे. प्रत्येक पक्ष हा मागील राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगा फटक्याने सावध भूमिकेत आहे. मते मिळवण्यासाठी पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमदारांसाठी हॉटेल बुक करण्यात येत आहेत. आता 12 जुलै रोजी सदाभाऊ निवडून येऊन आमदारकीची माळ गळ्यात घालणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.