चेन्नई : 17 वर्षाच्या आयुष म्हात्रे ला आयपील मधील चेन्नई सुपर किंग्स च्या संघात खेळण्यास संधी देण्यात आली आहे. सीसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापत झाल्याने त्याच्या जागी मुंबई च्या आयुष म्हात्रेला संघात घेण्यात आले आहे.

17 वर्षाच्या मराठी तरुणाला संधी
चेन्नईकडून काही दिवसांपूर्वी काही तरुण खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या, त्यानंतर संघाने मुंबईचा तरुण सलामीवीर फलंदाज म्हात्रेला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या जागी पृथ्वी शॉच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र ऋतुराज गायकवाडच्या जागी 17 वर्षांच्या मराठी खेळाडूला चेन्नईने संधी दिली आहे. आयुष म्हात्रे येत्या काही दिवसांत चेन्नईच्या संघात सामील होणार आहे. आयपीएल लिलावात म्हात्रेची मूळ किंमत 30 लाख रुपये होती, परंतु त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते.

आयुष म्हात्रेची कारकीर्द
मूळचा विरार चा असलेला आयुष यंदा इराणी संघात खेळून मुंबई संघात पदार्पण केलेलं आहे. आयुष म्हात्रेने 9 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळलेल्या 16 डावांमध्ये 504 धावा केल्या आहेत, आयुष म्हात्रेची सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे. आयुष म्हात्रेने यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. लिस्ट एमध्ये त्याने 7 डावात 458 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज सध्या त्यांच्या ७ व्या सामन्यासाठी लखनौमध्ये आहेत, जो सोमवारी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळला जाणार आहे.