कोल्हापूर, (प्रतिनिधी ) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून कार्यरत असून आज अखेर 18 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. या योजनेतून 4 लाख 78 हजार 427 लाभार्थींना 1285.24 लाख रुपये निधी थेट बँक खात्यात जमा झाला आहे. योजनेतील 19 वा हप्ता लवकरच वितरीत होणार असून विविध त्रुटींच्या पूर्तते अभावी सुमारे 20 हजार 718 लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. यासाठी जिल्ह्यात दिनांक 13 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, स्वयं नोंदणीकृत शेतक-यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती आधार सिडिंग करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे.

या मोहिमे दरम्यान काही सुचनांचे पालन करणे आवश्यक असून त्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत-

  • ई-केवायसी प्रमाणीकरण करणे – प्रलंबित लाभार्थी संख्या – 6 हजार 426 असून महा ई-सेवा केंद्र किंवा गावच्या कृषी सहायकाशी संपर्क करुन पी. एम. किसान मोबाईल ॲपमधून चेहरा स्कॅन करावा किंवा अंगठा स्कॅन करुन बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करुन घ्यावी.
  • नव्याने नोंदणीसाठी 666 लाभार्थी प्रलंबित असून त्यांनी महा ई-सेवा केंद्रातून अलीकडचा 7/12, फेरफार, पती-पत्नी आधार कार्ड, वारस नोंद असल्यास फेब्रुवारी – 2019 पूर्वी जमीन धारणा असलेला फेरफार (file size 200 KB) पोर्टल वर अपलोड करावयाचे आहे.
  • बँक आधार सिडिंगसाठी 10 हजार 670 लाभार्थी प्रलंबित असून त्यांनी नजिकच्या बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून बँक शाखेशी संपर्क करुन आपले अद्यावत असलेले आधार कार्ड बँक खाती संलग्न करुन घ्यावे किंवा नजीकच्या पोस्टात DBT enbled असलेले खाते उघडावे.
  • भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करण्यासाठी 3 हजार 36 लाभार्थी प्रलंबित असून तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून भूमिअभिलेख नोंदी संबधित 1-18 कॉलम मधील माहिती अद्यावत करावी.
  • पी. एम. किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, भूमि अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे.
  • केंद्रशासन पी. एम. किसान योजनेचा 19 वा हप्ता माहे फेब्रुवारी 2025च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल.

यास्तव या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दिनांक २१ डिसेंबर २०२४ पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमे दरम्यान करावी. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.