मुंबई (प्रतिनिधी) : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी’ याविषयावर कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यापासून, भारतीय शैक्षणिक परिसंस्थेत परिवर्तनात्मक बदल घडवून आणले आहेत.

त्याचा दूरगामी परिणाम अनेक बदलांमधून दिसून येत आहे. या धोरणांतर्गत अभ्यासक्रम-संरेखित शिक्षणाकडे वळणे, प्रादेशिक भाषा हे शिक्षणाचे माध्यम, शिक्षणात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन तसेच शैक्षणिक आणि व्यावहारिक ज्ञानातील अंतर कमी करणे आदी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठात या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कशाप्रकारे करण्यात येत आहे. याचबरोबर या विद्यापीठात आणखी कोणकोणते नवनवीन अभ्यासक्रम आणि उपक्रम सुरु करण्यात आले आहेत.

याविषयी कुलगुरु डॉ. शिर्के यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि. 14, सोमवार दि. 16, मंगळवार दि. 17 डिसेंबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.