मुंबई ( प्रतिनिधी ) : अभिनेता वरुण धवनचा ‘बेबी जॉन’ चित्रपट 25 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सध्या अभिनेता वरुण धवन चित्रपटाच्या प्रमोशन करताना दिसत आहे. प्रमोशन दरम्यान अभिनेता वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे. अशातच एका मुलाखती दरम्यान अभिनेत्याने गृहमंत्री अमित शाह यांना देशाचे हनुमान अशी उपमा दिली आहे.
नुकतंच अभिनेता वरुण धवनने आणि गृहमंत्री अमित शाह यांनी एका इव्हेंटला उपस्थिती लावली होती. यावेळी वरुणने गृहमंत्र्यांना अगदी एका पत्रकाराप्रमाणेच काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांवर गृहमंत्री अमित शाह यांनी दिलखुलास आणि मजेशीर उत्तर दिली. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे.
वरुन धवन म्हणतो, “सर, तुम्ही आज जे काही सांगितलंत ते ऐकून मी प्रभावित झालो आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. “प्रभु श्री राम आणि रावण या दोघांमध्ये सर्वात मोठा फरक काय आहे ?” ”अभिनेत्याच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांनी उत्तर दिले की, “काही लोकं धर्माला स्वत:ची जबाबदारी मानत काम करतात, तर काही लोकं स्वत:च्या फायद्यासाठी धर्माचा वापर करुन घेतात. हाच प्रभु श्री राम आणि रावण या दोघांमधला सर्वात मोठा फरक आहे. प्रभु श्री राम धर्माच्या आधारे जगले तर, रावणाने धर्माला आपल्या मर्जीने बदलण्याचा प्रयत्न केला.”
पुढे वरुण म्हणाला की, “तुम्ही मगाशी अहंकारावर म्हणाले, तर माझ्या मनात असा विचार आला होता की रावणाला त्याच्या ज्ञानाचा अहंकार आहे तर प्रभु श्री रामांना अहंकाराचं ज्ञान आहे.” यावर अमित शाह म्हणतात, “दोन्हीही अहंकाराच्या व्याख्या धर्मामध्येच येतात.” पुन्हा वरुण म्हणतो, “मी आजवर तुम्हाला टीव्हीवरच पाहत आलोय. आयुष्यात आज पहिल्यांदाच मी तुम्हाला समोरासमोर लाईव्ह बघतोय. काही लोक तुमचा उल्लेख राजकारणातले चाणक्य असता करतात. पण मी सांगू इच्छितो की देशाचे हनुमान आहात जे कोणताही स्वार्थ न बाळगता देशसेवा करत आहेत. जितक्या स्पष्टपणे ते आपले विचार मांडतात हे आम्ही कलाकार सुद्धा स्क्रीप्ट वाचून बोलू शकत नाही.” अभिनेत्याच्या विधानाचे अनेक युजर्स सध्या सोशल मीडियावर जोरदार कौतुक करीत आहेत.