माणगाव : गावात सामाजिक सलोखा टिकावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं विशेष ग्रामसभेच आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत विशेष ठराव करून गावामध्ये डॉल्बी, चौकात डिजिटल फलक लावणे, सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस निमित्त फटाके वाजविणे यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

माणगाव ता.हातकणगंले येथे रविवार (दि.12 मे) रोजी मोबाइलवरील स्टेटसवरुन दोन समाजात तणाव निर्माण झाला होता.अशा प्रकारचे वाद पुन्हा होऊ नयेत म्हणून हा महत्वपूर्ण निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीनं घेण्यात आलाय.

माणगावमध्ये विविध धर्मिय महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. जयंती दिनी युवक दुचाकी वाहनांच्या पुंगळ्या काढून गावभर फिरतात. यामुळे वादावादीचे प्रसंग घडतात. परिणामी गावात सामाजिक व धार्मिक तणाव वाढत आहे. यालाच आळा घालण्यासाठी, सामाजिक सलोखा टिकावा याकरिता ग्रामपंचायतीने‌ आचारसंहिता बनविली आहे.

 ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेत सर्वधर्मिय शांतता कमिटी स्थापन करणे, गावामध्ये धार्मिक-सामाजिक-राजकीय कार्यक्रम सह वाढदिवसानिमित्त डिजीटल फलक न लावणे, डॉल्बी न लावणे, पुंगळया काढून वाहन पळविणे यावर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे, रात्रीच्या वेळी फटाके वाजवण्यालाही बंदी घालण्यात आली आहे.

…तर ग्रामपंचायतीच्या वतीने गुन्हे दाखल –

नियमावलीचे उल्लघंन केल्यास संबंधितांचे खासगी नळ कनेक्शन एक वर्षासाठी बंद व  घरफाळामध्ये पाच हजार रुपयांचा दंड आकारुन वसूल करण्याचा ठराव सभेने संमत केला आहे. तसेच जातीय तणाव होईल असे स्टेटस लावणे असे मजकूर सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्य्हात आला.

ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत हा ठराव अनिल जगदाळे, नंदकुमार शिंगे यांनी मांडला. याला  अनिल  पाटील, दादासो  वडर यांनी अनुमोदन दिले. ग्रामसभेच्या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय कार्यालय इचलकरंजी, तहसिलदार ऑफिस व हातकणंगले पोलिस स्टेशनला  देण्यात आली आहे.