मुंबई : जसजसे लोकसभा निवडणुकीला रंग चढत आहेत तसतसे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून नवनवे गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019 साली एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचे ठरले.मात्र, रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव सुरुवातीला मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. ते शक्य नसल्याचे लक्षात येताच संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला होता, असं उमेश पाटील यांनी म्हटलंय. संजय राऊत  धादांत खोटं बोलतात. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला संजय राऊतांचाच विरोध होता असा हल्लाबोलही उमेश पाटील यांनी संजय राऊतांवर केलाय.

उमेश पाटील म्हणाले, 2019 साली जाणीवपूर्वक शरद पवार यांनी अजित पवार व्हिलन होतील अशी भूमिका  घेण्यात आली होती. कारण त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायच होतं त्यावेळी  एकनाथ शिंदे यांना करणार होते. मात्र रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे आदित्य ठाकरे यांना करावं असं ठरलं. परंतु शरद पवार यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष सुप्रिया सुळे मुख्यमंत्री राहतील. त्यामुळेच भाजपसोबत आमची जी डील झाली होती. ती फिरवण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. अजित पवार यांना क्षमा करून उपमुख्यमंत्री केलं असा दावा करतात. परंतु शरद पवार यांना पर्याय नव्हता म्हणून त्यांना अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करावं लागलं कारण सर्व आमदारांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी केली होती.