मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निकालामध्ये जनतेच्या दिलेल्या कौलानुसार महायुतीला सर्वांधिक जागा मिळालेल्या आहेत. तर, महाविकास आघाडीला खूप कमी जागा मिळाल्या आहेत. तर येत्या काही महिन्यातच महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. अशातच आता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली पहायला मिळते.

संजय राऊत काय म्हणाले..?

राऊत म्हणाले, गेल्या दोन अडिच वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आतापर्यंत या निवडणुकात युती किंवा आघाडीमध्येही लढल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही सध्या कोणताही निर्णय घेतलेला नसून आम्ही कोणताही निर्णय घेताना तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेत असतो. त्यामुळे सगळे पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. त्याचबरोबर, संजय राऊतांच्या वक्तव्यावरूनच उद्धव ठाकरे वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

संजय राऊत पुढे म्हणाले, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागू द्या, शिवसेनेने मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली असून मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ते महाराष्ट्रात राहिले पाहिजे, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुका लढत राहू, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.