मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकींनंतर विधानसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहेत. अनेक दौरे बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. अशातच आता ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा विधानसभेसाठी कंबर कसली आहे. मागील महिन्यात युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला होता. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या दोन जाहीर सभा होणार असून यातून ते कुणावर तोफ डागणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा असणार दौरा..!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज, रविवारी (15 सप्टेंबर) वैजापूर, पैठण दौऱ्यावर येत आहेत. वैजापूर येथे पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला, तर पैठण येथे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे सकाळी दहा वाजता मुंबईहून खासगी विमानाने शिर्डीला रवाना होणार आहेत. 11 वाजता शिर्डी संस्थान येथे श्री साईबाबांचे दर्शन ते घेणार आहेत. त्यानंतर ते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी एक वाजून 15 मिनिटांनी ते शिर्डीहून वैजापूरकडे रवाना होणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दुपारी एक वाजून 50 मिनिटांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी उद्धव ठ्कारेंची सभा होणार आहे. यावेळी भाजपचे काही मोठे नेते पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.

यानंतर दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी ते वैजापूरहून पैठणला रवाना होणार आहेत. सव्वाचार वाजता त्यांचे पैठण येथे आगमन होणार आहे. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता ते पैठणहून चिकलठाणा विमानतळाकडे रवाना होणार आहेत. साडेसहा वाजता त्यांचे विमानतळावर आगमन होणार असून, नंतर ते खासगी विमानाने मुंबईला रवाना होणार आहेत.

निवडणुकीदरम्यान हे दौरे सभा होत असल्याने आज उद्धव ठाकरे कुणावर हल्लाबोल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.