कोल्हापूर (प्रतिनिधी) : परजिल्ह्यातून येऊन पाहणी करून सराईतपणे दुचाकी चोरणाऱ्या दिपक पांडुरंग वाघमारे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली. त्याने चोरलेल्या मोटारसायकली जप्त केल्या. वाघमारे विरूद्ध यापुर्वी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात एकूण 22 मोटर सायकलचे गुन्हे दाखल आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत त्याचबरोबर घडलेलेे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे रेकॉर्डवरील आरोपी तसेच वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.

पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रोहीत मर्दाने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना तपास पथकास खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील सांगली जिल्ह्यातील आरोपी दिपक वाघमारे, हा चोरीची स्प्लेंडर मोटर सायकल घेवून 13 डिसेंबर रोजी शिये, ता. हातकणंगले गावचे हद्दीत रामनगर येथे येणार आहे. मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने 13 डिसेंबर रोजी सापळा लावून आरोपी नामे दिपक पांडुरंग वाघमारे, (वय 31, रा. चिकुर्डे, ता. वाळवा, जि. सांगली) सध्या रा. शिरटेकर चाळ, इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली यास नंबर प्लेट नसलेल्या काळे रंगाचे स्प्लेंडर मोटर सायकलसह ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात असलेली स्प्लेंडर मोटर सायकल ही चोरीची असल्याचे त्याने कबूल केले.

त्याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले. सदरचा आरोपी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असलेने त्याचेकडे कौशल्यपुर्ण अधिक तपास केला असता त्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातून एकूण 12 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केलेची माहिती सांगितली. आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 7,05,000/- रुपये किंमतीच्या 12 मोटर सायकली हस्तगत केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रोहीत मर्दाने, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने, संजय पडवळ, युवराज पाटील, अमित सर्जे, राजेंद्र वरंडेकर आणि सायबर पोलीस ठाणेकडील सुहास पाटील यांनी केली आहे.