कुरुंदवाड (प्रतिनिधी) : सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांच्या खून प्रकरणात आणखी दोन संशयित सहभागी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिस पथक नेमले असून संशयित आरोपीचा शोध घेतला जात आहे.

पैशाच्या देवाणघेवाणीतून संतोषचा गेल्या आठवड्यात खून करुन आरोपी पळून गेले होते. कुरुंदवाड पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी नितेश वराळे, सूरज जाधव आणि तुषार भिसे (तिघेही रा. सांगली) यांना अटक केली आहे. महापालिकेत नोकरी लावण्यासाठी संतोषने तीन लाख रुपये घेतले होता. वर्ष उलटले तरी नोकरीही नाही आणि पैसेही परत देत नसल्याने जाधव आणि भिसे यांच्या सहाय्याने चाकूने वार करून खून केल्याची कबुली मुख्य आरोपी वराळे याने दिली होती.

मात्र, खूनाचे नेमके कारण, आणखी कितीजणांचा सहभाग होता याची आरोपीकडून चौकशी केली असता आणखी दोघांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले असून संशयित दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे तपासी अधिकारी तथा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितले.