कोल्हापूर, (प्रतिनिधी) : गांधीनगर येथील एका मजुराला मारहाण करून त्याच्याकडील किंमती मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलीसांनी अटक केली. सचिन गोरख जाधव (वय २५, रा. आयोध्या कॉलीनी, रिंगरोड) आणि संग्राम अनिल खामकर (वय २२, रा. मदिना मोहल्ला टाकाळा) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून मोबाईल रोख रक्कम व मोपेड असा सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी राम प्ररवेज कुमार (वय २४, रा. कोयना कॉलनी, गांधी नगर) याने फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मूळचा झारखंड राज्यातील नवागडचट्टी येथे राहणारा रामकुमार हा काही महिन्यापासून करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील कोयना कॉलनीमधील अब्दुल सय्यद यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहतो. तो मजुरीचे काम करतो. काल (मंगळवार) रात्री तो कोल्हापुरातील दसरा चौक येथील एका एटीएम सेंटरमध्ये त्याच्या खात्यावर पैसे भरण्यासाठी आला होता. पैसे भरल्यानंतर तो मध्यवर्ती बसस्थानकाकडे जवळ गेला होता. त्यावेळी या परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ असणाऱ्या सार्वजनिक मुतारी जवळ थांबला होता.
सुमारे रात्री साडेबाराच्या सुमारास याठिकाणी काळया मोपेडवरून आलेल्या दोघा तरुणांनी रामकुमार याला मारहाण करून त्याच्याकडील किंमती मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले होते. याबाबतची फिर्याद रामकुमारने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलीसांनी सचिन जाधव आणि संग्राम खामकर या दोघा सराईतांना अटक केली.