मुंबई – महाराष्ट्रातील सिनेप्रेमींचे लाडके दादा-वहिनी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख यांना बॉलिवूडसोबत मराठी सिनेमासृष्टली लाडकी जोडी म्हणून ओळखले जाते. रितेश-जिनिलीयाकडे त्यांचे चाहते ‘कपल गोल्स’ म्हणून पाहतात. या दोघांची लव्हस्टोरी चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती. ज्या चित्रपटामुळे रितेश-जिनिलीया खऱ्या आयुष्यात एकत्र आले तोच चित्रपट आता 21 वर्षांनी पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे.अभिनेता रितेश देशमुखने आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून ही माहिती दिली. हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सध्या काही जुने गाजलेले बॉलिवूड चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केले जात आहे. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेप्रेमी या चित्रपटांसाठी गर्दी करत आहेत. आता, रितेशचा पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट 3 जानेवारी 2003 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. कॉलेजवयीन तरुणाची प्रेमकथा यामध्ये होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्याशिवाय,गाणीदेखील त्यावेळी लोकप्रिय झालेली. रामोजी राव हे या चित्रपटाचे निर्माते होते. तर, के. विजय भास्कर यांनी ‘तुझे तेरी कसम’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती.

रितेश-जिनिलीयाची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. तब्बल 10 वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी थाटामाटात लग्न केलं. ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट रितेश-जिनिलीयासाठी खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरला. याचं कारण, म्हणजे हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट होता आणि याच दरम्यान त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.