कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मा. आमदार अमल महाडिक यांचेसोबत आज बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 11 पर्यंत असोसिएशनच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली. पर्यटन व्यावसायिकांच्या विविध समस्या आणि कोल्हापूर पर्यटन डेस्टिनेशन म्हणून पर्यटकांच्यात आता आहे त्यापेक्षाही अधिक पर्यटन प्रिय करण्यासाठी काय करावे लागेल याविषयावर विस्तृत आणि अतिशय समाधानकारक चर्चा झाली.
आमदार साहेबांशी प्रत्यक्ष चर्चेसाठी DTOAK चे सदस्य मोठ्या संख्येने हजर होते आणि बहुतांश सदस्यांनी चर्चेत भाग घेत आपले मुद्दे मांडले. मा. आमदार अमल महाडिक साहेबांनी चर्चेत उपस्थित झालेल्या सर्वच प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन नुसते चर्चेवर अवलंबून न राहता कृती कार्यक्रम दिला.
स्टार एअर लाइन्सची वारंवार होणारी कॅन्सेलेशनची समस्या..
अलीकडे स्टार एअर लाइन्सच्या विमान सेवांची अचानक आणि वारंवार होणाऱ्या कॅन्सलेशनमुळे प्रवाश्यांना आणि विशेषतः टूर ऑपरेटरस् ना मोठ्या आर्थिक नुकसानीला आणि मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. टूर ऑपरेटरस् नी पुढील केलेली हॉटेल्स ,पर्यटन वाहने यांचे बुकिंगज आणि टूर कार्यक्रमावर याचा गंभीर परिणाम होत असून त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनेने टूर व्यावसायिक आणि अन्य प्रवासी हतबल झाले आहेत. त्यामुळे आमदार साहेबांना विनंती करण्यात आली की त्यांनी याप्रश्नी जातीने लक्ष घालून संबंधित यंत्रणेला त्यांच्या सेवेतील त्रुटी दूर करण्याचे निर्देश द्यावेत. टूर व्यावसायिक आणि सर्वच प्रवाशांची होणार अडचण, गैरसोय दूर व्हावी अशी मागणी संघटनेच्या सदस्यांनी केली.
रेल्वे प्रश्नाबाबत झालेली चर्चा आणि मागण्या..
- कोरोना काळापासून बंद असलेली कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावी. कोल्हापुरातील विविध घटकांकडून वारंवार मागणी होऊनही ही मागणीअद्याप प्रलंबित आहे.
- कोल्हापुरातून आठवड्यातून एकवेळ सुटणाऱ्या निजामुद्दीन,अहमदाबाद या रेल्वे दररोज सुरू कराव्यात.
- मिरजेतून सुटणारी राणी चेन्नमा एक्स्प्रेस पूर्ववत कोल्हापुरातून सोडण्यात यावी.
- जयपूर, कोलकत्ता, त्रिवेंद्रम किंव्हा एर्नाकुलम या ठिकाणांसाठी कोल्हापुरातून रेल्वे सेवा सुरू व्हाव्यात.
- कोल्हापुरातून सुटणारी वंदे भारत ट्रेन मुंबई पर्यंत असावी आणि ही ट्रेन दररोज सुटावी.
- कोल्हापुरातून सुटणाऱ्या ट्रेनचे कोच हे जुने असून कालबाह्य झालेले आहेत. या ट्रेनना सर्व सोयींनी परिपूर्ण अद्यावत नवे डबे जोडण्यात यावेत यासाठी प्रयत्न व्हावेत.
यासह पर्यटनविषयक अन्य विषयावर मनमोकळ्या चर्चा झाल्या.आमदार साहेबांनी यासाठी फक्त चर्चा न करता प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या कृती समिती स्थापन करूया. त्याच्या बैठका सुरुवातीस दर 15 दिवसांनी घेऊया. त्यानुसार कार्यक्रमाची आखणी करूया आणि प्रत्यक्ष काम सुरू करूया, असे ठोस आश्वासन दिले. कामाच्या गरजेनुसार केव्हाही एकत्र येऊन चर्चा करण्यास मी लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर सामान्य कोल्हापूरकर म्हणून कायम उपलब्ध असेन हे आवर्जून सांगितले.