गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण बचाव संघर्ष यात्रा उद्या (शनिवार) आयोजित करण्यात आली असून या यात्रेत खा. राजे संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती असणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष आहे. त्यामुळे भुदरगड तालुक्यात विविध मार्गाने आंदोलन होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भुदरगड तालुका सकल मराठा समाजाने उद्या मराठा आरक्षण बचाव संघर्ष यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या क्षात्र जगद्गुरु मठ आणि छ. शिवरायांचे गुरू श्री मौनी महाराज समाधीस्थळ पाटगाव (ता. भुदरगड) येथून सुरू होणार असून यात्रेची सांगता संत बाळूमामा समाधीस्थळ आदमापूर (ता.भुदरगड) येथे होणार आहे.
ही यात्रा पाटगांवपासून तांबाळे, कडगाव, करडवाडी, शेणगाव, आकुर्डे, गारगोटी, खानापूर, मडीलगे, कूर, मुदाळ आणि आदमापूर असा यात्रेचा प्रवास असणार आहे. या यात्रेत तालुक्यातील महिला, युवक-युवती, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या यात्रेचा शुभारंभ सकाळी नऊ वाजता खा. संभाजीराजे छत्रपती यांचे हस्ते होणार असून ते पूर्ण यात्रेत सहभागी होणार असल्याचे भुदरगड तालुका सकल मराठा समाजाने सांगितले.