मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील वारकरी टाळ-मृदुंगाचा गजर करत, विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन मुखी हरिनामाचा जप करत पंढरीच्या दिशेने जात आहे. ऊन, पाऊस, वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊलं टाकत आहेत. तर राज्यशासनाने वारकऱ्यांसाठी हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडल्या आहेत. शिवाय अनेक वारकरी आपल्या खासगी वाहनाने पंढरीच्या दिशेने जात असतात. या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली आहे. आजपासून 21 जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.

पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केला होता. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे गतवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं, त्याचा विचार करून सरकारने गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी केली होती. आता, यंदाही राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला असून आजपासूनच पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

पंढरपूरला आषाढी कार्तिकी निमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या आणि वाहनांना पथ करातून सूट देण्यात आली आहे. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे 3 जुलै ते 21 जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या आणि पंढरपूरहून गावी जाणाऱ्या सर्वच वाहनांना ही सवलत असणार आहे. दरम्यान, गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी
महाराष्ट्र राज्यातून पांढरपूरकडे येणारे सर्व पथकर नाक्यांवर उपरोक्त कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही पथकरातून सूट देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.